Jul 6, 2021

आयटीआय - औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 


·         उदिष्टे : पारंपारिक शिक्षणातून रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा कल सद्या वाढत आहे. कुशल कामगार तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हे आयटीआयचे उदिष्ट.

·         व्याप्ती : राज्यात प्रत्येक जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. राज्यात एकूण चारशे सतरा शासकीय आणि चारशे चोपन्न खासगी आयटीआय आहेत. यात ८० प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यातील शासकीय आयटीआयमध्ये 93 हजार 672 तर खासगी आयटीआयमध्ये 42 हजार 521 जागा उपलब्ध आहेत.

·         शैक्षणिक अर्हता : इयत्ता दहावी पास. आयटीआयमध्ये उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांपैकी काही अभ्यासक्रमांसाठी दहावी नापास तर काही अभ्यासक्रमांसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

·         आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, इत्यादी.

·         उपलब्ध अभ्यासक्रम : आयटीआयमधील सर्व अभ्यासक्रम एक किंवा दोन वर्षांचे आहेत. त्यात मुलांसाठी इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, कॉम्प्युटर ऑपरेटर, टर्नर, मोटार मेकॅनिक्स, वायरमन, पेंटर, नळ कारागीर, गवंडी, सुतारकाम, पत्रे कारागीर, फाउंड्रीमन, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, सेंटर ऑफ एक्सलंस - प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चारिंग सेक्टर, यांत्रिकी कृषी व यंत्र सामग्री, रेफ्रिजरेशन आणि एअरकंडीशन, रेडीओ आणि टीव्ही, ग्राइन्डर, मॅकेनिकल मशीन टूल्स मेंटेनन्स, टूल्स आणि डाय मेकर इत्यादी तसेच मुलींसाठी सेक्रेटरीयल प्रॅक्टिस, ड्रेस मेकिंग, बेसिक कॉस्मेटोलॉजी, बेकर कन्फेनशनर, फ्रुटस आणि व्हिजीटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टट, इन्टेरिअल डेकोरेशन आणि डिझाईन, फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी, इन्फोर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम्स, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स यासारखे ८०  अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

·         आरक्षण व सुविधा : मुलांसाठी असलेल्या अभ्यासक्रमांत मुलींना 33 टक्के आरक्षणही ठेवण्यात आले आहे. तसेच माध्यमिक शाळेतच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयतील सर्व अभ्यासक्रमांत 25 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीना दरमहा विद्यावेतन, एस टी सवलत पास, वैद्यकीय सुविधा, आदिवासी  प्रशिक्षणार्थीना टूलकीट आदी.

·         प्रवेश प्रक्रिया व संकेतस्थळ : आयटीआयची प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालाच्या दिवशी सुरु होते.  https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची यादी आणि अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक पात्रता, इतर नियम  www.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

·              संधी व फायदे : औद्योगिक प्रशिक्षणातून उत्तीर्ण विद्यार्थ्यास खासगी कंपन्यांसह महावितरण, एमआयडीसीमधील कारखान्यांमध्ये रोजगार उपलब्ध आहे. विद्यार्थी स्वयंरोजगारही करू शकतो. आयटीआयमधील कँपस इंटरव्हूच्या माध्यमांतून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आयटीआयमधून शिक्षण पूर्ण करून परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांना पगारही उत्तम मिळत आहे. विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी निवडलेला देश, कामाचे स्वरूप, कामाचा अनुभव यानुसार पगार ठरतो. सरासरी वार्षिक पाच ते आठ लाख रुपये विदेशात पगार दिला जातो. मुंबई, पुणे, नाशिक येथील कंपन्यांमध्ये अनुभवानुसार प्रतिमाह पंधरा ते चाळीस हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो.


No comments:

Post a Comment